मुंबई - राज्यात झालेल्या दलित निर्घृण हत्येप्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. नागपूर येथील अरविंद बनसोड, पुणे येथील विराज जगताप या युवकांच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाने आवाज उठवला आहे.
पिंपळे येथील हत्या झालेल्या दलित मुलाचे सवर्ण मुलीवर प्रेम असल्याने ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. नागपुरातील अरविंद बनसोड हत्येविषयी बातम्या येत असतानाच रविवारी रात्री पुणे-पिंपळे गुरव येथील विराज याची हत्या झाली आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या मुलाचे सवर्ण मुलीवर प्रेम असल्याने ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील पिम्पळधरा गावात अरविंद बनसोड या दलित विद्यार्थ्याचा निर्घृण खून झाला आहे. पोलिसांनी या संदर्भात आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप होत आहे. नरखेड़ हे राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे विधानसभा क्षेत्र आहे, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच याबाबत केस उभी राहताना पुराव्यामध्ये कुठेही त्रुटी राहू नयेत, हे पाहणे गरजेचे आहे. विराज जगताप आणि अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाचा वेगाने तपास करून दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे, दलित जातीय अत्याचार कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही. सत्य जनतेसमोर यायला विलंब होत आहे, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात जातीय द्वेषाचे लोण मोठ्या प्रमाणात शहरी भागातही पसरत असल्याचे दिसते आहे. यात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आशीर्वादामुळे गुंड प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. याचबरोबर न्यायालयातीळ विलंब आणि कायद्याचा कमी झालेला वचक हाही कारणीभूत आहे. धर्मांध प्रवृत्तीचे राजकारण सर्व समाजात 'धार्मिक द्वेष' आणि 'जाततणाव' सुद्धा वाढवते, ही वस्तुस्थिती या घटनामधून अधोरेखित होत आहे.