मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली. यात काही जुनेच चेहरे आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून राष्ट्रीय स्तरावर देशात ४०० प्लस तर महाराष्ट्रात ४५ प्लस असे मिशन ठेवण्यात आले आहे. एकूण 2024 ची लोकसभा नजरेसमोर ठेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून तिघांना संधी : भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर या तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे व पंकजा मुंडे यांचे स्थान राखत त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले आहे. तर विजया रहाटकर यांना संधी देत त्यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे असलेली राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारीसुद्धा कायम ठेवण्यात आली आहे.
बावनकुळे यांनी केले अभिनंदन : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय पातळीवर नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नेत्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय महामंत्रिपदावर विनोद तावडे तसेच राष्ट्रीय सचिवपदी पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांची निवड झाली आहे. याबद्दल या तिघांचे व अन्य पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन!
18 राष्ट्रीय उपाध्यक्ष : नव्या टीम मधे 13 जणांची राष्ट्रीय उपाध्यक्ष्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर 8 जणांना राष्ट्रीय सरचिटणीस यासह १३ राष्ट्रीय सचिवांची करण्यात आले आहे यात, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंदी संजय कुमार आणि राधामोहन अग्रवाल यांना सरचिटणीस करण्यात आले आहे.