मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, की राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकूण 15.72 कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये तर 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये आणि 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.
सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन
राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करून विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच 22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.