मुंबई - विक्रोळी-कांजूरमार्ग बालविकास प्रकल्पाअंतर्गत 'बेटी बचाव बेटी पढाओ' या अभियानाला आज विक्रोळीमधील अंगणवाडी सेविका महिलांनी रॅली काढली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. योगेश भालेराव यांच्या हस्ते नारळ फोडून या अभियानास सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा - प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून सुरुवात; भरतीला मराठा नेत्यांचा विरोध
अंगणवाडी सेविका महिलांनी ही रॅली विक्रोळी पूर्व टागोरनगर ग्रुप नंबर ३ येथील पोलीस बिट चौकी येथून सुरू केली. यावेळी लेझिमचा ताल धरत 'बेटी बचाव बेटी पढाओ' अशा घोषणा देण्यात आल्या. यादरम्यान पोलीस कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार, रिक्षा चालक, बेस्ट बस चालक, कर्मचारी, माथाडी कामगार, दुकानदारदेखील हातात 'बेटी बचाव बेटी पढाओ'चे पोस्टर घेऊन अभियानात सहभागी झाले.
या रॅलीत मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. हे अभियान २१ ते २६ जानेवारीपर्यंत असेच चालू असणार आहे, असे विक्रोळी-कांजूरमार्ग बालविकास प्रकल्पाच्या
पर्यवेक्षक नंदिता काळभोर यांनी माहिती दिली.
हेही वाचा - गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती