मुंबई - शारदीय नवरात्रोत्सवातील आज (रविवार) आठवा दिवस आहे. या अष्टमीच्या दिवशी मुंबईतल्या माहिम येथील शितलादेवी दर्शनासाठी रविवारी भाविकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिर परिसर फुलून गेला आहे. तसेच अष्टमीनिमित्ताने अडीचशे वर्ष जुन्या मंदिरात रविवारी हवन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक आर्थिक घोटाळा : बँकेचे माजी संचालकाला माहिम येथून अटक
रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पर्यटक भाविकांसह आज स्थानिक भाविकांची संख्या जास्त होती. नवरात्रकाळात देवीला तेल वाहण्याची प्रथा असल्यामुळे महिला भाविक मोठी गर्दी करतात. भक्तांची महाप्रसाद व उत्तम दर्शनासाठी सोय केली असल्याचे व्यवस्थापक ट्रस्टी यांनी सांगितले.
अश्विन महिन्यातील नवरात्र आणि माघ महिन्यातील नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस भाविकांची रेलचेल पाहायला मिळते. नवरात्रीदिनी देवीला चांदीची छत्री व शृंगार, शाल घातली जाते. मंदिराचा संपूर्ण कारभार अवधूत दाभोळकर व सावंत हे पुजारी पाहतात. नवरात्र उत्सवादरम्यान आज अष्टमीच्या दिवशी हवनाचा कार्यक्रम असतो आणि रात्री महिलांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील या मंदिरात केले आहेत.
शितलादेवी मंदिराचा इतिहास -
कोळ बांधवांचे कुलदैवत असलेल्या शितलादेवीचे माहिम येथील मंदिर हे अडीचशे वर्षापूर्वीचे आहे. ही देवी पूर्वी मुंबईच्या किनाऱ्यालगत होती. मात्र, कालांतराने कोळी बांधवांनी शितलादेवीची मूर्ती किनाऱ्यावरून हलवून ती आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थापन केली. शितलादेवीवर कोळी बांधवांची खूप श्रद्धा आहे. या मंदिराच्या एकाच छताखाली खोकला देवी, शीतला देवी, जरीमरी देवी, मनमाला देवी, केवडावती देवी, चंपावती देवी, संतोषी देवी अशा सात देवी आहेत. त्यामुळे या मंदिराला 'सात आसरी' देवी म्हणून देखील ओळखले जाते.
हेही वाचा - सरकारी बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; थकलेल्या वेतनातील फरक खात्यावर जमा