मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं विनयभंगाचं प्रकरण तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता आक्रमक झाल्या असून महिला प्रदेशध्यक्षा विद्या चव्हाण यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेत सध्या राज्यात सुरू असलेल्या कायद्याच्या दुरूउपयोगाबाबत त्यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण - याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या की, आता राज्यात लोकशाही राहिली नाही आहे. शिंदे - फडणवीस यांची हुकूमशाही सुरू आहे. आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांना भेटलेला जामीन हा सरकारला व पोलिसांसाठी मोठी चपराक आहे. जिथे हा प्रकार घडला तेव्हा तिथे त्या गाडीत मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. पोलीस अधिकारी उपस्थित होते. आव्हाड यांच्या बाजूने एक लोंढा येत होता त्यांना बाजूला सारत असताना हा प्रकार घडला. ते ही त्यांनी एका हाताने त्या महिलेला बाजूला सारले. कुठलाही विनयभंग वैगेरे झालेला नाही.
सीएम साहेब खबरदार, गाठ आमच्याशी आहे - विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, हा जो आव्हाड यांचा प्रकार घडला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेला घरी बोलावून ही तक्रार द्यायला सांगितली असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला आहे. यासर्व प्रकरणासाठी आम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो आहोत. फार मोठ्या प्रमाणात कायद्याचा दुरुपयोग होत आहे. आम्ही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याऐवजी आमच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. ते गुन्हेही इतके भयंकर आहे की, त्यामध्ये सात वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशाप्रसंगी दोशींवर कारवाई करण्याएवजी आमच्यावर उगीचच कारवाई केली जात आहे असे सांगत, सीएम साहेब खबरदार गाठ आमच्याशी आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून कधी उचलून फेकले जाईल, ते माहीतही पडणार नाही, असा इशारा देण्याबरोबर खोके घेऊन खुर्च्या मिळवल्या आहेत, म्हणून कायद्याचा दुरुपयोग करू नका? अशी टीका विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.़