मुंबई - राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच केवळ १३ मिनिटांमध्ये विधानपरिषदेचे कामकाज तहकूब झाले. विरोधी पक्षाने शेतकरी आणि महिलांवरील अत्याचारांच्या विषयांवर स्थगन प्रस्ताव आणला होता. मात्र, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तो नाकारल्याने विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. यामुळे सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
हेही वाचा - खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर
विधानपरिषदेच्या कामकाजाला सोमवारी दुपारी १२ वाजता 'वंदे मातरम' या गीताने सुरूवात झाली होती. सुरूवातीला सभापतींनी सभागृह नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याचे सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांनी स्वागत केले. दरम्यान, बीड आणि यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संजय दौंड आणि दुष्यंत चतुर्वेदी यांचा सभागृहाला परिचय करून देण्यात आला. गेल्या अधिवेशनात नाराज झालेले काँग्रेसचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडट्टेवार आणि मृदा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचाही परिचय सभागृहात करण्यात आला. अध्यादेश पटलावर ठेवण्यासाठी सभापतींनी पुकारले आणि त्याच दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचारांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी मागितली.
हेही वाचा - सरकार पाडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली, नारायण राणेंचे भाकीत
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा प्रस्ताव न मांडता पुढील दिवशी आणावा, अशी सुचना सभापतींनी केली. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी हा विषय लावून धरत सभागृहात आपले बोलणे सुरूच ठेवले. हा प्रस्ताव सभापतींनी नाकारताच विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यातच सभापतींनी कामकाज पत्रिकेतील कामकाज आटोपून घेतले. अध्यादेश, पुरवणी मागण्याही यावेळी पटलावर मांडण्यात आल्या. तालिका सभापती म्हणून गोपीकिशन बाजोरीया, अनिल सोले, अनिकेत तटकरे, दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे यांच्या नावांची घोषणा करताच सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.