मुंबई Rahul Narvekar Foreign Tour : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आठवडाभराच्या परदेश दौऱ्यावर जात आहेत. घाना येथे होणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. राहुल नार्वेकर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह घानाला भेट देणार आहेत.
राष्ट्रकुल संसदीय परिषद : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 30 सप्टेंबर रोजी परदेश दौऱ्यावर जात आहेत. घाना येथे 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही संसदीय परिषद ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. राष्ट्रकुल संसदीय परिषदेत जगातील विविध देशांच्या संसद, विधिमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत राजकीय समस्या, जागतिक संसदीय कार्यप्रणाली यावर विचारमंथन केलं जाईल. या परिषदेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं नार्वेकर सप्टेंबरमध्ये पूर्ण आठवडा विदेशात असतील.
सुनावणीचं वेळापत्रक सादर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राज्य विधिमंडळ आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचं वेळापत्रक सादर करणार असल्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना सुनावणीची रूपरेषा 2 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी वेळापत्रक निश्चित केलं असून ते आज न्यायालयात सादर करता येणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयात 13 ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
- 20 ऑक्टोबरला पुन्हा एकदा कागदपत्र सादर करण्यासाठी संधी देणार
- 27 ऑक्टोबरला दोन्ही गट आपापले मत मांडणार.
- 6 नोव्हेंबर रोजी दोन्ही गटांनी मांडलेल्या मतावर दावे प्रतिदावे केले जाणार
- 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या दाव्यावर सुनावणी होणार
- 20 नोव्हेंबरला दोन्ही गटाच्या साक्षीदारांच्या यादी सादर करणार
- 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार.सर्व कागदपत्रांची, पुराव्यांची तपासणी झाल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार अशी माहिती समोर येत आहे.
विषय लवकरच मार्गी लावू : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या याचिकांवर निर्णय घेण्यास कोणताही विलंब किंवा घाई होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सुनावणीची प्रक्रिया कशी असेल? याबाबत सर्व पक्षकारांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई सुरू राहील. या संदर्भात निकाल देऊन लवकरच हा प्रश्न सोडवू, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. एकीकडं शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे पडसाद उमटत असतानाच दुसरीकडं विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर जात आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता विरोधकांकडून वर्तवली जात आहे.
हेही वाचा -