मुंबई - हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयात सिंहांना कोरोना झाल्याचा प्रकार ताजा असतानाच प्राण्यांना कोरोना होण्याची भीती प्राणी पाळणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. मुंबईमध्येही कोरोना प्रसार असल्याने आपल्या पाळीव प्राण्यांनाही कोरोना झाल्याची भीती अनेक नागरिकांना आहे. या पार्श्वभूमीवर पशु वैद्यकीय रुग्णालयात दोन मांजरांचे स्वॅब घेऊन पालिकेच्या केईएम रुग्णालयात तपासणी करण्यात आली. ते अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याची माहिती पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी दिली आहे.
प्राण्यांनाही कोरोनाची भीती?
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्राण्यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे का? याची भिती अनेकांमध्ये आहे. बहुतांशी लोकांच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात. कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर घरच्या प्राण्यांनाही कोरोनाची बाधा होते, अशी मनात भिती असल्याने लोक आजारी प्राण्यांचे स्वॅब टेस्ट करून घेण्यासाठी येत आहेत.
4 मांजरांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
शिवाय देशात काही ठिकाणी प्राण्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काही श्वान व मांजरांची तपासणी करण्यात आली. पालिकेच्या केईएम रुग्णालयात जून महिन्यात दोन मांजरांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यापूर्वीही मांजरांच्या स्वॅबचे 4 नमुने केईएमच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणीनंतर या प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा
केईएम रुग्णालयात मोठी आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. अनेक तज्ज्ञ या प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वाधिक कोरोना चाचण्या याच लॅबमध्ये केल्या जातात. त्यासह प्राण्याचे संशयित कोरोना स्वॅब देखील याच लॅबमध्ये पाठवले जातात. कोरोना काळात यापूर्वीही प्राण्यांचे स्वॅब तपासण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत एकालाही कोरोना झालेला नसल्याचे तपासणीतून समोर आले आहे.
'प्राण्यांमुळे कोरोना पसरला नाही'
'प्राण्यांमुळे कोरोना माणसांमध्ये पसरल्याचे अद्याप आढळलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'कोव्हिड-१९' हा विषाणूजन्य रोग माणसाला घरात पाळल्या जाणार्या प्राण्यांपासून, शेतात पाळल्या जाणार्या घोडे-गायी-बैलांकडून किंवा कोंबडीच्या मांसातून होत नाही', असे डॉ. अजित रानडे यांनी सांगितले.
- — Maneka Sanjay Gandhi (@Manekagandhibjp) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Maneka Sanjay Gandhi (@Manekagandhibjp) April 7, 2020
">— Maneka Sanjay Gandhi (@Manekagandhibjp) April 7, 2020
मांजरे कोरोना पसरवत नाहीत - मेनका गांधी
"मांजरे कोरोना संक्रमित होत नाहीत किंवा कोरोना पसरवू शकत नाहीत. आपण जर काही अशा अफवा ऐकल्या असतील, तर हे चुकीचे आहे. एका प्राणीसंग्रहालयात वाघाला कोरोना झाला. पण लक्षात ठेवा, मांजर वाघ नाही. आपल्या मांजरी पूर्णपणे सुरक्षित आहेत", असे यापूर्वी भाजपा नेत्या मेनका गांधी यांनी म्हटले होते. याबाबतचा व्हिडिओही त्यांनी ट्विट केला होता.
हेही वाचा - सर्व सामान्यांना मिळणार मंत्रालयात प्रवेश, राज्य शासनाची सुधारित नियमालवी जाहीर