मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून गर्दी कमी करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर येथे सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेतच भाज्या आणि फळे विकावीत, असे निर्देश महापालिकेने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर सकाळी 11 नंतर भाजी मार्केट बंद करण्यात आली.
हेही वाचा - शेअर बाजार कोसळला; बीएसईमध्ये 1200 तर एनएसईमध्ये 300 अंकांची घसरण
मार्केटबाबत निर्णय
मुंबईत गेल्या वर्षभरापासून असलेला कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत मॉल, पब, नाईट क्लब, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी पालिकेने मुंबईमधील मार्केटवर लक्ष केंद्रित केले. दादरमधील मार्केट बांद्रा बिकेसी आणि चुनाभट्टीच्या सोमय्या उद्यानात हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी आजही गर्दी झाल्याचे दिसून येते. दादरमधील गर्दी कमी करण्यासाठी पालिकेने लवकरात लवकर पाऊले उचलण्याची गरज आहे.
घाटकोपरमध्ये अंमलबजावणी सुरू
घाटकोपरमध्येही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी पालिकेने भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना सकाळी 7 ते सकाळी 11 आणि सायंकाळी 4 ते सायंकाळी 7 ही वेळ ठरवून दिली आहे. यावेळेतच विक्रेत्यांनी आपले व्यवसाय लावून भाजी आणि फळे विक्री करावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. 11 वाजल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी मार्केट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी आपले व्यावसाय बंद करण्यास सुरुवात केली. काहींनी 11 वाजताच व्यवसाय बंद केले होते, तर 11 वाजल्यानंतरही काही नागरिक भाज्या आणि फळे खरेदी करण्यास येत असल्याने काही विक्रेते व्यवसाय बंद करता करता भाजी आणि फळे विकून आपला माल संपवताना दिसून आले.
एकच वेळ ठरवून द्या
कोरोनामुळे या नियमांचे आम्ही पालन करू. पालिकेने आम्हाला एकच वेळ ठरवून दिली असती तर आम्हाला बरे झाले असते. पण, दोन वेळांमध्ये 5 तासांचे अंतर आहे. व्यवसाय लावायला आणि बंद करायला सुमारे 1 तासाचा कालावधी लागतो. याबाबत पालिकेने विचार करण्याची गरज आहे, असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - नायर रूग्णालयात मार्डचे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात