मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून शिवसेना पक्ष कोणाचा? पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं? याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या वादावर आयोगाने काल महत्त्वाचा निर्णय दिला. ज्या गटाकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी तोच खरा पक्ष, असा महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर यावर राजकीय वर्तुळात मतमतांतरे पाहायला मिळाली आहेत.
आंबेडकरांचा आयोगाला सवाल : निवडणूक आयोगाच्या या निकालावर वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत वादावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. मुळात देशामध्ये वेळेवर निवडणुका घेण्याचं मुख्य काम निवडणूक आयोगाचं आहे. पक्षांतर्गत वादावर न्यायनिवाडा करणे हे काम त्यांचं नाही. हाच मुद्दा धरत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, त्यांना तिथे नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
'आयोगाने निवडणुका वेळेवर घ्याव्यात' : पक्षांतर्गत वादावर न्यायनिवाडा करण्यापेक्षा देशातील निवडणुका वेळेवर व्हाव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काम केले पाहिजे. गेल्या सहा ते आठ महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत, अद्यापही त्या कधी होतील याबाबत शाश्वती नाही. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाला संविधानाने निवडणूक घेण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. निवडणूका कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत. मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारात त्यांना पक्षांतर्गत वादावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? हे देखील तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जायलाच पाहिजे, तिथे त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी : शुक्रवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ लोकप्रतिनिधींच्या संख्येवर घेतलेला निर्णय योग्य नसून, आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लाखो प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगात जमा केले होते. त्या प्रतिज्ञा पत्रांचे नेमकं महत्त्व काय? ते कशासाठी जमा करण्यात आले होते ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आयोगाला विचारला आहे.
हेही वाचा : FIR On Ajay Rai : कॉंग्रेस नेते अजय राय यांच्यावर गुन्हा दाखल, राहुल गांधींच्या विमानावरील वक्तव्य भोवलं