मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. आंबेडकरांनी थेट शिवसेनेच्या संदिग्ध भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरे प्रकरणी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आरे प्रश्न हा फक्त मेट्रोचा नाही, तर बिल्डर लॉबीचा आहे असेही आंबेडकर म्हणाले.
सत्ता आल्यानंतर आरेतील झाडे तोडणाऱ्यांवर करावाई करू असे, उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता कोणाची सत्ता आहे? असा सवाल उपस्थित करत आंबेडकरांनी सेना आता निवडणुकीतून हद्दपार होईल, असे सांगितले. सरकारने त्यांच्याकडे आरेचे काय वर्गीकरण केले आहे, ते स्पष्ट करावे अशी मागणी केली. तसेच आरे प्रकरणी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका फसवी असल्याचे सांगितले.
हेही वाचा - 'आरे'तून अटक करण्यात आलेल्या 29 निदर्शनकर्त्यांना जामीन मंजूर
काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपचे मिंधे
लेखकांवर देशद्रोहाचा गुन्हा योग्य नसून हा संघराज्याचा देश आहे. पंतप्रधान ५ वर्षांसाठी निवडलेला प्रतिनिधी आहे, तो राजा नाही, अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली. राहुल गांधी प्रचाराला येणार नाही याचा अर्थ ते आधीच हारलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते देखील हारलेले आहेत. यांना आदित्य ठाकरे विरोधात साधा उमेदवारही देता येत नाही. दोन्ही पक्ष भाजपचे मींधे झालेत. त्यामुळे प्रमुख लढत महायुती आणि वंचितमधेच होईल, असे प्रकाश आंबेडकर शेवटी म्हणाले.
हेही वाचा -महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांत घोळ; 40 लाख बोगस मतदारांची नोंदणी - प्रकाश आंबेडकर