मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३ - २४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेला २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आधी २०१३ - १४ मध्ये रेल्वेला देण्यात आलेल्या निधी पेक्षा हा निधी ९ पट अधिक आहे. या निधीमधून रेल्वेतून दररोज भारतात प्रवास करणाऱ्या अडीच कोटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत सीएसएमटी स्थानक मुंबई, दिल्ली रेल्वे स्थानक, अहमदाबाद रेल्वे स्थानक सारख्या मोठया आणि छोट्या अशा १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या विकास कामाला गती मिळणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
लातूरमध्ये वंदे भारत तयार होणार : माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २०१८च्या अर्थसंकल्पात लातूर रेल्वे कारखान्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील लातूरमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडने (आरव्हीएनएल) या कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचे काम पूर्ण झाले असले तरी देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या रेल्वे कारखान्यातून हजारो रोजगार निर्मितीची प्रतीक्षा कायम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवरील सुविधा असल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे प्रोडक्शन वाढवले जाणार आहे. याकरिता इंटीग्रल कोच फैक्ट्री (आईसीएफ), चेन्नई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील लातूर, हरयाणातील सोनीपथ आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची निर्मिती करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
हायड्रोज रेल्वे गाड्या धावणार : आत्मनिर्भर भारत अंतर्गत डिसेंबर २०२३ पर्यत हायड्रोजन ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या हायड्रोजन ट्रेन्स पूर्णपणे स्वदेशी असतील, ज्यांचे डिझाइन भारतीय अभियंते करत आहेत. या गाड्या डिझेलवर किंवा विजेवर न धावता हायड्रोजन गॅसवर धावणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. सर्व प्रथम हायड्रोजन रेल्वे गाड्या देशातील हेरिटेज सर्किटवर चालविण्यात येणार आहे. त्यानंतर इतर मार्गावर टप्याटप्याने हायड्रोजन ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कामाला गती : देशातील पहिली मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु केली जाणार आहे. या ट्रेनच्या प्रकल्पाचे काम गुजरातमध्ये प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम महाविकास आघाडी सरकारचा काळात रखडले होते. परंतु, आता महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंदाही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे असेही वैष्णव यांनी सांगितले.
हेही वाचा - Reaction On Budget : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच प्रतिक्रियांचा पाऊस! वाचा कोण काय म्हणाले