मुंबई Nanotechnology In Building Construction : मुंबईतल्या वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक दत्ताजी शिंदे यांनी नॅनो टेक्नॉलॉजीवर बरंच संशोधन केलं आहे. सध्या ते अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी शिकवतात. इमारतींची किंमत कमी कशी होईल तसंच इमारती टिकाऊ, मजबूत आणि पर्यावरणस्नेही कशा होतील, यावर त्यांचं संशोधन आधारित आहे. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नॅनो टेक्नॉलॉजीच्या बांधकाम क्षेत्रातील संशोधन बाबत सविस्तरपणे..
भारतात पाहिजे तेवढं संशोधन झालेलं नाही : नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये नॅनो ग्लास फायबर, नॅनो कंपोझिट कार्बन फायबर आणि पोलिमेरिक कंपोझिट ग्लास फायबर असे मटेरियल असतात. या मटेरियलचा उपयोग विमान बांधणीमध्ये केला जातो. हे मटेरियल अत्यंत टणक, टिकाऊ आणि मजबूत असते. तसंच वाहन क्षेत्रामध्ये देखील या मटेरियलचा वापर केला जातो. परंतु भारतात बांधकाम क्षेत्रामध्ये याचा वापर अजूनही करण्यात आलेला नाही. याला कारण म्हणजे, यामध्ये पाहिजे तेवढं संशोधन झालेलं नाही. मात्र आता यावर संशोधनाला सुरुवात होऊन बांधकाम क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत.
नॅनो टेक्नॉलॉजीमुळे घरांच्या किमती कमी होणार : नॅनो टेक्नॉलॉजीमार्फत अत्यंत सूक्ष्म पदार्थाचा वापर सूक्ष्म जागेवर करता येतो. वैज्ञानिक भाषेत याला १ ते १०० नॅनो मीटर क्षेत्रामध्ये अतिसूक्ष्म पद्धतीनं काम करणं असं म्हणतात. कार्बन ग्लास पॉलिमर फायबर आणि कंपोझिट ग्लास फायबर याचा वापर करून बिल्डिंग मटेरियलमध्ये मजबूती आणता येते. यामुळे इमारत बांधकामाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
बांधकाम क्षेत्रात वरदान ठरेल : या विषयावर प्रा. दत्ताजी शिंदे यांनी अधिक प्रकाश टाकला. "पॉलिमेरिक ग्लास फायबर आणि पॉलिमेरिक कार्बन कॉम्पोझिट मटेरियलचा वापर वाहन, विमान बांधणी आणि एरोस्पेसमध्ये होतो. हा वजनानं हलका, ताकदवान आणि पर्यावरणस्नेही पदार्थ आहे. यामुळे बांधकामाचा खर्च कमी होतो. १ ते १०० नॅनो मीटर आकारात हे फायबर बनवलं जातं. यामुळे कॉम्पोझिट मटेरियलच्या अपयशावर मात करता येईल आणि बांधकाम क्षेत्राचाही विस्तार होईल. कार्बन पॉलिमरिक नॅनो फायबर ग्लासचं हे संशोधन बांधकाम क्षेत्रात पुढील काळात वरदान ठरणार आहे", असं त्यांनी सांगितलं.
१० वर्षापर्यंत देखभाल करावी लागत नाही : प्रा. दत्ताची शिंदे पुढे सांगतात की, "हे संशोधित मटेरियल मुंबई महापालिकेला रस्ते बांधकामासाठी प्रायोगिक तत्वावर दिलं आहे. हे रस्त्यावर रेलिंगसाठी वापरलं जातं. याशिवाय रोड फिनिशिंगसाठी देखील त्याचा उपयोग होतो. यामध्ये ग्लास फायबर असतं. या मटेरियलचं वैशिष्ट्य म्हणजे, ते वजनानं हलकं असतं आणि १० वर्षापर्यंत त्याची देखभाल करावी लागत नाही".
कंपोझिट मटेरियल कसं काम करतं : कार्बन नॅनो ग्लास फायबर वापरल्यानं इमारतीच्या बांधकामात सिमेंटचा वापर कमी होतो. सध्या हे व्हिजेटीआयच्या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्यानं तयार केलं जात आहे. याचा वापर आणि मागणी वाढल्यानंतर अधिक मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य आहे. याद्वारे घरांच्या किमतीचा खर्च आवाक्यात येऊ शकतो. तसंच दहा वर्षापर्यंत याचा देखभाल खर्च काहीच नसतो, असं प्रा. दत्ताजी शिंदे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :