मुंबई - देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या शरजिल इमाम याच्या समर्थनात घोषणाबाजी करणारी उर्वशी चुडावाला बुधवारी स्वत: आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाली. यावेळी पोलिसांनी तिची तब्बल ६ तास चौकशी केली.
हेही वाचा - शरजील इमाम समर्थन प्रकरणी उर्वशी चुडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
उर्वशीच्या बँक खात्यांशी संबंधित व्यवहार आणि इतर संपर्क साधनांबाबत पोलीस तपास करत आहेत. चौकशीला सामोरे गेल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यावर उर्वशीने प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले.
हेही वाचा - राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, 19 फेब्रुवारी पासून अंमलबजावणी
काय आहे प्रकरण...
२ फेब्रुवारीला आझाद मैदानात समलैंगिक प्राईड मार्च काढण्यात आला होता. यावेळी उर्वशी चुडावाला आणि तिच्या ५० सहकाऱ्यांनी देशद्रोहाचा आरोपी शरजिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. 'आसाम राज्याला भारतापासून वेगळे करू' असे वादग्रस्त वक्तव्य शरजिलने केले होते. त्याच्या समर्थनार्थ 'शरजिल तेरे सपनोको हम मंजिल तक पोहचाएंगे' असे नारे उर्वशी आणि तिच्या सहकाऱ्यांनी लगावले होते. या घटनेचा व्हिडिओ तिने समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. यावर जोरदार टीका झाल्यानंतर उर्वशीने हा व्हिडिओ काढून टाकला होता. याप्रकरणी उर्वशी चुडावाला हिच्यासह ५० जणांविरोधात कलम १२४ ए (देशद्रोह), १५३ बी (राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह) आणि ५०५ (सार्वजनिक गैरवर्तन विधान) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.