मुंबई - स्मार्ट सिटी म्हणून मुंबईला संबोधले जाते. मात्र, गेल्या 2 दिवसात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची दैना उडाली असल्याची टीका सिने अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केली. उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रातील दहिसर विधानसभा परिसरातील गणेशमंडळांना भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना मातोंडकर म्हणाल्या, आधुनिकीकरणाच्या विरोधात कोणी नाही. मात्र, निसर्गाला डावलून विकास केला तर त्याचा प्रकोप होईलच. मुंबईतील एकमेव हरितपट्टा असलेल्या आरेतील झाडांना वाचवले पाहिजे, असेही उर्मिला यांनी यावेळी सांगितले.
राज्यात एकीकडे मराठवाड्यात दुष्काळ आहे, तर दुसरीकडे सातारा, कोल्हापूर परिसरात पुराचा तडाखा बसला आहे. या स्थितीतून महाराष्ट्राला बाहेर येण्याचे बळ दे, अशी प्रार्थना गणरायकडे केल्याचेही उर्मिला यांनी सांगितले.