मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकासआघाडीतील मंत्र्यांसह शिवसैनिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
शिवसैनिकांप्रमाणे माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा क्षण-
देशातील शिवसैनिकांप्रमाणे हा माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा क्षण आहे. शिवसेना प्रमुख हे देशातील मोठे नेते होते. त्यांचे विचार देशाला मार्गदशक ठरणारे आहेत. तसेच सर्व पक्षातील नेत्यांची त्यांचे चांगले संबध होते. सर्व पक्षीय नेते मतभेद विसरून या कार्यक्रमाला आले. याचे मला समाधान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले.
शिल्पकार, वास्तू विशारद तसेच सल्लागांचा सत्कार -
शिल्पकार शशी वडके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर वास्तू विशारद रोहन चव्हाण यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते, सल्लागार भूपन रामनाथकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते, अभियंता प्रदीप ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कडक बंदोबस्त; तरीही गर्दी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यामुळे फोर्ट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाचा प्रभाव अजूनही असल्याने आवश्यक खबरदारी घेऊनच कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, आपल्या लाडक्या नेत्याला जवळून पाहण्यासाठी शेकडो चाहते जमा झाले होते.
सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा क्षण -
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी अत्यानंद होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले, हा सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा क्षण आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दिली. राज ठाकरे बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. राज ठाकरे यांनी पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले आणि ते वेळेआधी हजर झाले होते. याचा अर्थ दोन्ही ठाकरेंमधील बंधूप्रेम कायम आहे, असेही त्या म्हणाल्या.
असा आहे शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा -
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच पुतळा आहे. हा पुतळा नऊ फूट उंच असून १२०० किलो ब्राँझ धातूपासून हा पुतळा बनविण्यात आला आहे. तसेच सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.