मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर शिवसेनेविरोधात भाजपा आणि आरपीआय आक्रमक झाले आहेत. आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांची भेट घेत, या मारहाणीचा निषेध केला. मदन शर्मा यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
कांदिवली येथे राहणाऱ्या मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे हात जोडून उभे आहेत, अशा आशयाचे हे चित्र होते. याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मदन शर्मा यांना दूरध्वनीवरून जाब विचारला. त्यानंतर त्यांनी शर्मा यांना मारहाण केली. यात शर्मा यांच्या डोळ्याला जखम झाली. हा सर्व प्रकार त्यांच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मला पळवून मारले आहे. मात्र, पोलिसांनी चुकीचे कलम लावले आहेत. त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. मला झालेल्या मारहाणीनंतर मला बोलायला जमत नाही. मला एका डोळ्याने कमी दिसत आहेत. देशात न्यायव्यवस्था टिकली पाहिजे, म्हणून मी या घटनेबाबत न्याय मागत आहे, असे शर्मा यांनी सांगितले
मदन शर्मा यांना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर योग्य ते कलम लावले नाही आहे. यामुळे त्यांना एका दिवसात जामीन मिळाला. शर्मा यांना न्याय मिळावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे व शर्मा यांना न्याय मिळवून देणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.