मुंबई - 'जलजीवन मिशन' या महत्त्वकांक्षी प्रकल्पांतर्गत शुध्द पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी खासगी नमुने तपासणीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच लवकरच माफक दरात पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही ते म्हणाले.
शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट -
पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे शासनाचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाणी तपासणीच्या दरामध्ये सुधारणा करणे अपेक्षित होते. प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुने तपासणीसाठी विहित केलेले दर ८०० रुपयांऐवजी ६०० रुपये प्रमाणे निर्धारित केले आहेत. प्रयोग शाळेमध्ये खाजगी पाणी नमुने तपासणीचा खर्च, त्याकरिता लागणाऱ्या वेळेमुळे नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत होता. राज्यातील ग्रामीण जनतेला खाजगी पाणी नमुने फिल्ड टेस्ट किट्सच्या मदतीने तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक घटकांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतक्या माफक दरात राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळामध्ये सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. रासायनिक तपासणीमध्ये धातू, विरघळणारे क्षार, नाइट्रेट, फ्लोराइड, लोह यांची तपासणी करुन प्रति नमुना ५ रुपये शुल्क आकारला जाईल. तर जैविक दृष्ट्या पाणी पिण्यास योग्य असल्याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी ५ रुपये प्रति नमुना शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच फिल्ड टेस्ट किट्सद्वारे प्रयोगशाळेत तपासणीसाठी १० रुपये इतका दर आकारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रयोगशाळेमध्ये विहित शुल्क आकारून तपासणी -
फिल्ड टेस्ट किट्सद्वारे तपासणीसाठीचे हे दर शासकीय, सहकारी, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी लागू राहतील. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त प्रत्येक प्रयोग शाळांमध्ये खाजगी पाणी नमुने तपासणीसाठी पाणी नमुना व अर्ज जमा केल्यास पाणी नमुन्यांची प्राथमिक फिल्ड टेस्ट किटद्वारे केली जाईल. प्राथमिक दृष्ट्या दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांची सखोल तपासणी प्रयोगशाळेमध्ये विहित शुल्क आकारून करण्यात येईल, अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरे 'तो' ठाकरीबाणा दाखवतील का- दरेकर