मुंबई - महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा वाद पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे. हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही नेते मी गटनेता आहे, असे सांगत आहे. त्यामुळे आता व्हीप कोणाचा मानायचा यावरून आमदारांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.
शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवारांनी राज्यपालांकडे सादर केलेले कागदपत्र चुकीचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. तसेच भाजपचा शपथविधी देखील कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला. याविरोधात महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच भाजपला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, भाजप बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावे लागेल असे उज्ज्वल निकम म्हणाले.