मुंबई Uddhav Thackrey on Ram Temple : मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये यादव समाज सेवा संस्थेच्या वतीनं गोवर्धन पूजा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. नेहमी निवडणुकीच्या काळात काही लोक युपी, बिहारमधून येतात आणि इथल्या लोकांचं ब्रेन वॉश करुन निघून जातात. मात्र, आम्ही निवडणुकानंतरही तुमच्या सोबत राहतो. या कारणामुळं मराठी आणि युपीचे लोक हे दूध व साखरेप्रमाणे आहेत. पण काही लोक या नात्यांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावलाय.
हृदयात राम व हाताला काम : याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आताच झालेल्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवण्यात येईल, अशा पद्धतीचं विधान केलं होतं. याप्रसंगी या विधानाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह तसंच भाजपावर हल्लाबोल केलाय.
"प्रभू श्रीराम ही तुमची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल उपस्थित करत केंद्रात आमचं सरकार येणार आहे. आम्ही ते आणणारच आहोत. हृदयात राम व हाताला काम अशा पद्धतीचं आमचे हिंदुत्व आहे. शिवसैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता मनोभावे लोकांची कामं करतात." -ठाकरे गटाचे अध्यक्ष-उद्धव ठाकरे
आमच्या ताटामधून हिसकावून घेऊन जाऊ नका : उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, तुम्हाला वाटतं की श्रीराम आणि बजरंगबली की जय, म्हटल्यानं सर्व हिंदू तुमच्याबरोबर येतील. पण शिवसेना आणि भाजपाच्या हिंदुत्वामध्ये हाच फरक आहे. आमचं हिंदुत्व दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात असताना मुंबईतील लोकांनी सुद्धा तिकडं जायचं का? त्याचप्रमाणे गुजरातची प्रगती झाली तर संपूर्ण देशाची प्रगती होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. असं असंल तर महाराष्ट्राची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार नाही का? गुजरातची प्रगती करण्यासाठी आमच्या ताटामधून हिसकावून घेऊन जाऊ नका, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली
धर्माच्या विरोधामध्ये अधर्म उठतील : आतापर्यंत ज्यांना आम्ही आपलं समजलं तेच आता आमचे शत्रू बनून समोर उभे ठाकले आहेत. त्यांनी आपलं 'धनुष्यबाण' सुद्धा चोरलंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. महाभारतामध्ये कृष्णानं सांगितलं की धर्माच्या विरोधामध्ये अधर्म उठतील व त्यांचा नाश करावा लागेल. त्या पद्धतीनं आता धर्माच्या विरोधामध्ये जाणाऱ्या भाजपाला कायमचा धडा शिकवणं सुद्धा गरजेचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय.
हेही वाचा :