मुंबई - मोदी सरकारच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांची 'इंडिया' आघाडीची ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होत आहे. याच अनुषंगाने दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांचीही मुंबईतील वरळी डोम येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक होत आहे. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसाठी शिवसेना (उबाठा गट)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३१ ऑगस्टला रात्री स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्याच रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. एकंदरीत आता या दोन्ही डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून राज्यातील राजकारणावर चर्चा होणार आहे.
विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी- २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. 'इंडिया' आघाडीची तिसरी महत्त्वाची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. यासाठी विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने सुद्धा ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठकीचे आयोजन केलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी हॉटेल ग्रँड हयात येथे विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील सर्व नेत्यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी ३१ ऑगस्टच्या रात्रीच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आठवले, कवाडे, ठाकूर, कोरे, कडू, खोत,जानकर हे सर्व महायुतीबरोबर- बैठकीविषयी बोलताना भाजपाचे समन्वयक, आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ३१ आणि १ सप्टेंबरला मुंबईत संयुक्त बैठका घेऊन त्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना शिंदे गट, भाजाप, राष्ट्रवादी अजित पवार गट, यांच्यासह आरपीआय रामदास आठवले गट, आरपीआय जोगेंद्र कवाडे गट, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, विनय कोरे यांची जनस्वराज्य शक्ती, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष हे सर्व घटक पक्ष एकत्रित येणार आहेत. त्याचबरोबर ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी सर्व नेत्यांसाठी स्नेहकार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सर्व पक्षाचे आमदार, खासदार, संपर्कप्रमुख, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख नेते यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे बैठका घेणार आहेत.
- अशा होतील बैठका - प्रथम मुंबई शहर आणि कोकण यांची सकाळी १० ते १२ यादरम्यान बैठक असेल. त्यानंतर विदर्भाची बैठक ही १२ ते १:३० पर्यंत होईल. त्यानंतर १:३० ते २:३० मराठवाड्याची बैठक होईल. २:३० ते ३:०० भोजनासाठी राखीव असेल. त्यानंतर ३ ते ४:३० पश्चिम महाराष्ट्राची बैठक होईल. ४:३० ते ५:३० उत्तर महाराष्ट्राची बैठक होईल.
यापूर्वीही असे अनेकदा प्रयत्न- मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'इंडिया' आघाडीची बैठक होत आहे. म्हणून आम्ही बैठक घेणार नसून आमची बैठक ही पूर्ण नियोजित आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी असा प्रयत्न नेहमीच निवडणुकीदरम्यान केला जातो. मागच्या वेळीसुद्धा काही असंतुष्ट लोक एकत्र आले होते. त्यांनी मोदी यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यंदा पूर्वीपेक्षा मोदी यांना जास्त मतं मिळतील, असाही दावा उदय सामंत यांनी केला. 'इंडिया' आघाडीचं नेतृत्व कोणी करावे हा त्यांचा प्रश्न आहे. केजरीवाल काय बोलत आहेत? नितीश कुमार काय बोलत आहेत? हे सर्व पाहता पुलाखालून बरचं पाणी जायचं आहे, असे दिसते. मोदी यांची दिवसेंदिवस होत असणारी प्रगती पाहता विरोधकांना मोदींविषयी पोटशूळ झाला असल्याचही सामंत म्हणाले आहेत.
दुसऱ्याच्या नादाला लागून... २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उद्घाटनप्रसंगी हल्ला होण्याची भीती शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की यात काही तथ्य नाही आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की राम मंदिर बनलं पाहिजे आणि काश्मीर मधील ३७० कलम हे हटवलं गेलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवल्या आहेत. यासाठी यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेच्या नेत्यांनी, खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत प्रशंसा केली आहे. त्यांना समर्थन दिलं आहे. परंतु दुसऱ्याच्या नादाला लागून आता काहीतरी त्यांना वेगळं बोलावं लागत आहे, असा टोलाही उदय सामंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा-
MahaYuti Vs INDIA : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी 'महायुती'ची मुंबईत बैठक? तारखा एकच...