मुंबई : पंतप्रधानांची डिग्री, वीर सावरकर, उद्योगपती अदानी यांच्यावरून आघाडी पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील मतभिन्नता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. आघाडीत डॅमेज कंट्रोल करून समेट घडून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीत धुसफूस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून देशात खिल्ली उडवली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या डिग्रीवरून प्रश्न उपस्थित केले होते. वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून ठाकरे आघाडीच्या विरोधातील भूमिका मांडली त्यांनी मांडली होती. तर सुप्रसिद्ध उद्योगपती अदानी यांची जेपीसी चौकशी करावी, या काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीकडून भाजपला पूरक अशी भूमिका घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हे प्रमाण वाढू लागले आहे. ईव्हीएम मशिनबाबत ही राष्ट्रवादीने भाजपची पाठराखण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदलत्या वक्तव्याबाबत महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. यावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
राजकीय रणनीती ठरवण्याबाबत भेट : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी रात्री आठच्या सुमारास भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी तासभर चर्चा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर ठाकरे, पवार यांच्यातील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दुसरीकडे भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच बाबरी मशीद बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यात यावरून वातावरण तापले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावले आहे. तसेच, शिंदे गटाचा मिंधे असा उच्चार करत चौफेर हल्लाबोल केला. आजच्या दिवसभरातील या घटनांमुळे राजकीय रणनीती ठरवण्याबाबत ही भेट झाल्याचे ही समजते.
रविवारी नागपूरमध्ये सभा : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा येत्या रविवारी नागपूरमध्ये होत आहे. केंद्रासहित राज्यातील भाजपच्या हुकूमशाहीच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी आघाडीने वज्रमुठ आवळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्राबल्य असलेल्या नागपूरात सभा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेचे नेतृत्व करत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांची फौज ठाकरेंच्या दिमतीला असणार आहे. त्यामुळे या सगळीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजची शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यातील भेट ही या सभेचा भाग असल्याचे बोलले जात आहे.