वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही वारणसीत आले होते. त्यावेळी त्यांनी वाराणसीतील कालभैरव मंदिरात पुजा केली. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपने शक्तीप्रदर्शन केले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान हे इत्यादी नेतेही उपस्थित होते. तसेच भाजपतर्फे सुषमा स्वराज, पीयूष गोयल, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी यांनी हजेरी लावली.
सकाळी कार्यकर्त्यांची बुथ सभा घेतल्यानंतर त्यांनी काळभैरव मंदिरात जावून दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर ते वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रस्त्यावर कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोदींच्या समर्थनार्थ गर्दी केली होती.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी वाराणसीत काल (गुरुवारी) शक्तीप्रदर्शन केले. सायंकाळी ५ वाजेपासून त्यांनी ७ किलोमीटरपर्यंत रोड शो केला. यावेळी अनेक समर्थक उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीही केली. रोड शोमध्ये त्यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, जे. पी. नड्डा इत्यादी नेते हजर होते.
राज्यात शिवसेना आणि भाजपने युती केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवत आहेत. भाजप अध्यक्ष आमित शाहांचा गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळीही ते उपस्थित होते.
मोदींनी यापूर्वी २४ एप्रिल २०१४ ला भरला होता उमेदवारी अर्ज -
पंतप्रधान मोदींनी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर या घटनेची आठवण होणे क्रमप्राप्त आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींनी २४ एप्रिल २०१४ ला वाराणसीतूनच उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली होती आणि मोदी देशाचे पंतप्रधान बनले होते. यावेळी मोदींनी 'मुझे मा गंगा ने बुलाया है' असे म्हटले होते.