मुंबई Uddhav Thackeray VS Eknath Shinde : 'शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. या वर्षी सुद्धा वाजत गाजत उत्साहानं शिवाजी पार्क म्हणजेच दादरच्या शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे' अशी घोषणा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यासाठीचा वाद टाळावा म्हणून शिंदे गटानं अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला. शिंदे गटानं शिवाजी पार्कचा आग्रह सोडल्यानंतर, आता दसरा मेळाव्यासाठी ओव्हल किंवा क्रॉस मैदानाची चाचपणी शिंदे गटाकडून सुरू आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : 'आपला दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार' असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या कोणत्या गटाला दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये साजरा करण्याची परवानगी मिळणार? पालिका नेमकी काय भूमिका घेणार? यावरून चर्चा सुरू होत्या. त्यातच आता दोन वर्ष दसऱ्याच्या आधी ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाला न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळालं होतं. यंदा मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानं माघार घेतल्यानं पुढील संघर्ष टळला आहे.
क्रॉस मैदानाचा पर्याय : क्रॉस मैदानाचा पर्याय निवडत शिवतीर्थासाठीचा अर्ज शिंदे गटानं मागं घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला वाजत गाजत शिवाजी पार्कवर येण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं आहे. तर, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार परब म्हणाले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग शिंदे गटानं नव्हं, तर आमचा आम्ही मार्ग मोकळा केला आहे. आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन अर्जातील विसंगती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. अर्जातील विसंगती आणि तृटी निदर्शनास आणून दिल्यानंतरही पालिकेनं निर्णय घेण्यास टाळाटाळ केली असती तर, आम्ही न्यायालयात जायच्या तयारीत होतो. पण, त्यांनी माघार घेऊन वाद टाळला हे बरं झाले, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख मिलिंद वैद्य यांनी पालिकेच्या दादर येथील जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दिले होते. दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं 'जी' उत्तर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. मागील वर्षी शिवाजी पार्कच्या जागेवरून पालिकेनं टाळाटाळ केल्यानं ठाकरे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी अधिकाऱ्यांची तांत्रिक चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला हे मैदान मिळालं होतं.
हेही वाचा :