मुंबई - पुण्यातील कोरोनाच्या फैलावाचा दाखला सर्वच जण देत आहेत. मात्र, वाईट अवस्था असलेल्या कोकणकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे पालकमंत्री तर कोरोना न होताही क्वारंटाईन झाल्याची शंका येते आहे, अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. कोकणातील कोरोना रुग्णांना पुरेशा खाटाही नाहीत, असेही त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? त्यांनी आतापर्यंत कोकणच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक का घेतली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सोशल मिडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
खाटांचीही कमतरता -
कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? मुंबईबाहेर शिवसेनेची वाढ सर्वप्रथम कोकणातच झाली. मात्र, या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले आहेत. आजघडीला सिंधुदुर्गमध्ये 3,675 सक्रिय रुग्ण असून केवळ 1,015 इतक्याच खाटा आहेत. तसेच रत्नागिरीत सध्या 7,772 रुग्ण उपचार घेत असून त्यांनाही खाटांची कमतरता भासत आहे.
हेही वाचा - दादरच्या गुरुद्वारात 'ऑक्सिजन लंगर', १० लाखांपेक्षा जास्त लोकांना दिले जेवण
बैठक घेण्याचे आवाहन -
कोरोना चाचण्यांबाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र, तरीही या जिल्ह्यांमध्ये ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावातील सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र, यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत, असा आरोपही लाड यांनी केला. दरम्यान, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात सर्व खासदार-आमदारांसह निदान दृकश्राव्य माध्यमातून तरी बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून