मुंबई: उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री नसून मास्टर आहेत. त्यांच्या मास्टस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले.पंतप्रधान मोंदीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही,असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले, की उद्धव ठाकरे यांना वडिलांचा पक्ष टिकविता आला नाही. सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवल्यानंतर आता श्रीरामचंद्रांची आठवण येत आहे. राम मंदिरांचे भूमीपूजन झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर महाविकास आघाडी सरकारने गुन्हे दाखल केले होते. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली बाळासाहेबांची शिवसेना प्रामाणिक शिवसैनिकाने मुक्त केली आहे. त्यानंतर बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने फडकविला आहे.
उद्धव ठाकरेंनी मोदींवर काय केली टीका- पंतप्रधान मोदींनी विरोधकांची महाआघाडी 'इंडिया'वर टीका केली होती. मोदींच्या या टीकेचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. कार्यकर्त्यांना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्यांचा विरोध करणाऱ्याचा पक्षांचा इंडिया ब्लॉकमध्ये समावेश आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशातील नेत्यांना भेटतात तेव्हा अभिमान वाटत असतो. तेव्हा तुम्ही त्यांना देशाचे म्हणजे 'इंडिया'चे पंतप्रधान म्हणून भेटतात का? की तुम्ही त्यांना इंडियन मुजाहिदीनचे प्रधान सेवक म्हणून भेटता?
भाजपा आयारामाचा पक्ष: भारतीय जनता पक्षात इतर पक्षातील नेते प्रवेश करत आहेत. त्यावरुन बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा आयारामांचा पक्ष बनला आहे. यामुळे ते आता आयाराम मंदिर बांधणार आहेत. मला भाजपच्या कार्यकर्त्यांची कीव येते. कारण त्यांना त्यांच्या पक्षात आलेल्या आयारामांची पूजा करावी लागते, असा त्यांनी पक्षांच्या फोडाफोडीवर टोला लगावला.
फडणवीसांची गाढवाशी तुलना: या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सध्या सरकारमध्ये दुसऱ्यांची ओझे वाहणारी गाढवदेखील आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याची आठवण करत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. मला देवेंद्रजींची दया येते. ते अजून किती ओझे वाहणार आहे? असा सवाल ही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसांची पंचाईत झाली आहे. त्यांना ते ओझे सहनही होत नाही अन् कोणाला सांगता येत नाही.
भाजपामध्येच औरंगजेबाचे वंशज: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'औरंगजेब की औलाद' हे वक्तव्य केले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुघल सम्राट औरंगजेबाचे वंशज भाजपामध्ये आहेत. औरंगजेब अजूनही जिवंत आहे. तो तुमच्या पक्षात आहे. कारण तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोडतात. राज्यात एकनाथ शिंदे नेतृत्त्वातील सरकार असतानाही औरंगजेबच्या नावावरून तणाव का निर्माण होत आहे? समाजात फूट पाडून भाजपा इतिहास रचत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. दरम्यान अजित पवारांच्या सरकारमध्ये सामील होण्यावरही त्यांनी भाष्य केले. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात वाद निर्माण केले जात असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.
इंडियाची 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरला होणार बैठक- भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडी 'इंडिया' या नावावर टीका केली होती. टीका करताना मोदींनी विरोधकांच्या इंडिया ब्लॉकची तुलना ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीनशी केली होती. फक्त इंडिया नाव ठेवून विरोधक देशवासीयांची दिशाभूल करू शकत नाहीत, अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. याला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. दरम्यान विरोधकांच्या इंडिया या गटाची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी होणार असून ठाकरे गटाकडे यजमान पद असणार आहे.
हेही वाचा-