मुंबई - मराठवाडा मुक्तीसंग्रमाच्या कार्यक्रमाला तेथील खासदार उपस्थित नव्हते. त्यांचा धर्म बघून त्यांना निवडून दिलं का? धर्मावरून आम्ही स्वीकारू. मात्र, औरंगजेबाच्या, निजामाच्या विचारसरणीचा खासदार म्हणून कार्यक्रमाला आले नसेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली.
'सावरकर इकोज फ्रॉम ए फॉरगॉटन पास्ट' या विक्रम संपत लिखीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली होती. त्यावरूनच उद्धव यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला. देशाच्या लोकसभेत असा खासदार निवडून येतो? अशा कठोर शब्दात टीका केली. यावेळी विधानपरीषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत आणि सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर आणि सावरकर इकोज फ्रॉम ए फॉरगॉटन पास्ट' या पुस्तकाचे लेखक विक्रम संपत उपस्थित होते.
सावरकरांवर टीका करणाऱ्या मणिशंकर अय्यरला आजही जोडे मारू -
काँग्रेसने कितीही सावरकरांचा द्वेष केला तरी सावरकर संपत नाहीत. सावरकर हा चमत्कार होता. लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मोकळा केला. ते पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न नसता. सावरकर पंतप्रधान झाले असते, तर पाकिस्तान दिसला नसता. राजकारण्यांची आजची दुकाने बंद झाली असती. सावरकरांवर टीका करणाऱ्या मणिशंकर अय्यरला आजही जोडे मारू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल गांधी बेअक्कल - उद्धव ठाकरे
मी राहुल गांधीला नालायक बोललो. राहुल गांधी हे बेअक्कल आहेत. त्यामुळे आता ते पंतप्रधान होऊच शकत नाही. हे सावरकरांवर लिहिलेले पुस्तक बेअक्कल राहुल गांधीला वाचायला द्या. सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.