मुंबई Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाविरोधात ठाकरे गटानं मुंबईतील वरळीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला कायदेतज्ज्ञ, जनता, पत्रकार, राजकीय विश्लेषक, राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी वकील असीम सरोदे, रोहित शर्मा यांनी राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे, हे कायद्याच्या भाषेत समजून सांगितलं. पण आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळं याचा निर्णय जनताच घेईल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केलाय.
पुरावं की गाडावं : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'लबाडांनी दिलेल्या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोच. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आपण एवढे पुरावे सादर केले तरीसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय आपल्या विरोधात दिलाय. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्षांना पुरावं की गाडावं, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केलीय.
जनता सरकार ठरवत असते : सरकार कोणाचंही असेल, सत्ता ही जनतेची असते. आता न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला आता जनतेतून न्याय मिळेल. कारण जनता हीच सर्वस्वी असते. न्याय हा जनतेसाठी असतो. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात देखील न्याय मिळेल. मात्र, सरकार येतात, जातात. जनता सरकार ठरवत असते. सत्ता ही जनतेचीच असते, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझं त्यांना खुलं आव्हान : मींधे गटाला माझं आता खुल आव्हान आहे. राहुल नार्वेकर यांनी सुरक्षारक्षक बाजूला करून जनतेमध्ये यावं. बघूया जनता कुणाच्या बाजूनी कौल देते, ते समजेल अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे तसंच राहुल नार्वेकर यांना खुलं आव्हान दिलं.
तुमची लायकी आहे का : मिंधे गट आता उच्च न्यायालयात गेला आहे. तुमची लायकी आहे का? शिवसेना प्रमुख होण्याची, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित करत एकनाथ शिंदेंना टोला लगावला. आपण निवडणूक आयोगावर केस दाखल केली पाहिजे. कारण शेकडो कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिली. त्याची त्यांनी गादी केली का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दरम्यान, कागदपत्रासाठी जो खर्च आला आहे. त्याचे पैसे निवडणूक आयोगानं आम्हाला परत द्यावे, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
देशात लोकशाही जिवंत आहे का? : सध्या देशातील वातावरण गढूळ झाले आहे. सगळीकडे हुकूमशाही चालत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सत्ताधारी भाजपाच्या गुलाम झाल्या आहेत. नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघाले आहात. पण आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मला सत्तेचा मोह नाही : मला अनेकजण बोलत आहेत, तुम्ही जर राजीनामा दिला नसता, तर तुमच्या बाजूनी निकाल लागला असता. पण मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. त्यांच्या विचारानं, त्यांच्या संस्कारानं वाढलो आहे. मी शिवसैनिकांच्या विचारानं जगलो आहे. त्यामुळं मला मुख्यमंत्री पदाचा किंवा सत्तेचा मोह नाही. ज्यांच्यासाठी आपण एवढं केलं. ज्यांना खूप काही दिलं, त्यांना आपण सामोरं जाणार हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी एका रात्रीत राजीनामा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता एकच पक्ष जिवंत राहणार का? : मागं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी देशात फक्त भाजपा पक्षच राहील. याचा अर्थ कुठलाच पक्ष या देशात राहणार नाही, असं त्यांचे संकेत होते. मग या देशात लोकशाही जिवंत राहणार आहे का? हा माझा सवाल आहे. एकाधिकारशाही, हुकूमशाही वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मिंधे गट तसंच भाजपानं पायदळी तुडवलं आहे. त्यामुळं मला आता जनतेच्या न्यायालयात आशा आहे. आता आम्ही सर्व पुरावे, सादर करून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड केलीच आहे. परंतु आता आम्हाला जनतेतून न्याय मिळेल अशी, आशा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शहा माझ्याकडे का आले? : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी घटनेच्या आधारावर निर्णय दिला आहे. जर 1999 रोजी घटना दुरुस्ती नव्हती, 2013 रोजी मी पक्षप्रमुख नव्हतो, तर तुम्ही माझ्याकडं 2014 आणि 2019 मध्ये कशासाठी आला होता? तसंच मला दिल्लीत मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्यासाठी का बोलावलं होतं? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. म्हणजे मी पक्षप्रमुख आहे. म्हणूनच तर तुम्ही माझ्याकडं आला होता. हे मान्य आहे, तरीपण विधानसभा अध्यक्षांनी आमच्या विरोधात निकाल दिला आहे. त्या निकालाची चिरफाड आता जनताच करेल. त्यामुळे मी आता जनतेमध्ये जात आहे. यावर जनताच मला निर्णय देईल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
हेही वाचा -