मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हेरिटेज इमारत, आव्हानात्मक काम असल्याने वास्तूचे महत्त्व जपून काम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र लवकरच हे स्मारक जनतेसाठी खुले होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिली. आज सायंकाळी दादर येथील स्मारकाच्या कामाची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जलदगतीने काम सुरू : महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. जलदगतीने काम सुरू असून स्मारकाचे बरेचसे काम झालेले आहे. लवकर हे काम पूर्ण व्हावे, असे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. जनतेसाठी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक लवकरच खुल व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी, स्मारकाच्या डिझाईन पासून सर्वच सूचना आम्ही करत आहोत. आता प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली आहे. येथील झाडांना धक्का न लावता, हे काम पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. आव्हानात्मक स्थिती, वास्तू हेरिटेज असल्याने त्या वास्तूचे महत्त्व जपून स्मारकाचे काम पूर्ण करायचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात जुने फोटो, व्हिडिओ, बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील जनतेकडे बाळासाहेबांच्या आठवणी फोटो स्वरूपात असतील तर द्याव्यात, असे आवाहन ठाकरे यांनी केले. जनतेकडून आलेल्या वस्तू स्मारकात लावल्या जातील. बाळासाहेबांच्या अयोध्या दौऱ्या संदर्भात काहींच्या मनात शंका आहे. त्यांच्यासाठी बाळासाहेब आयोध्येला गेलेले फोटो, व्हिडिओ, बातम्यांची कात्रण मिळाली असून ती देखील स्मारकात लावण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांची झालेली भेट, खारघर येथील श्री साधकांचा मृत्यू, भ्रष्टाचारी सरकारचे काळे धंदे यावर बोलण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार देत, वेगळी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले.