मुंबई - कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती लक्षात घेता आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षेवर तोडगा काढला आहे. अंतिम वर्षांच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता केवळ पदवी घ्यायची आहे, त्यांना पदवी आणि ज्यांना परीक्षाच हवी आहे, त्यांची परिस्थिती निवळल्यानंतर परीक्षा घेण्याचा पर्याय जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
राज्यातील व्यावसायिक, अव्यासायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामंत यांनी दोन वेगळे निर्णय घेतले आहेत. कोणत्याही पारंपरिक अभ्यासक्रमांची म्हणजेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायचीच आहे, त्यांच्यासाठी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्यासाठीची अट यात ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, आदींसह शरीरशास्त्र अध्यापन आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेता येणार नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात मागील काही दिवसांपासून अंतिम वर्षांच्या परीक्षेवर मोठे राजकारण सुरू होते. त्यावर सामंत यांनी आज निर्णय जाहीर करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच विरोधीपक्षाकडून राज्यातील लाखो एटीकेटी विद्यार्थ्यांचे सरकार नुकसान करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावरही सामंत यांनी मौन सोडले आहे. बॅकलॉग असणाऱ्यांबाबत प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.