मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर एक बेवारस दुचाकी आढळली आहे. MH 01dd 2225, असा या दुचाकीचा क्रमांक आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) पोलिसांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक परिवहन विभागाकडे या दुचाकीची नोंद झालेली नाही. तसेच या गाडीचा चेसीस नंबरही रजिस्टर नसल्याची माहिती त्यांनी दिली.
गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून दुचाकीच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. हे दुचाकी वाहन गेल्या किती दिवसांपासून या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आली होती त्याच काही अंतरावर ही दुचाकी सापडली असल्याची माहिती मिळत आहे.
या अगोदर सापडली होती स्फोटकांनी भरलेली गाडी -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आढळून आली होती. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून हटवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आणि हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय बळावला. वाझेंची चौकशी झाल्यानंतर त्यांना अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती.
रंगले राजकारण -
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, यामुद्द्यावरून राज्यात राजकारण रंगले आहे.
हेही वाचा - Live Updates : महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण? वाचा नेमकी स्थिती...