मुंबई - शहरातील नालेसफाई व मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना दुर्घटना होण्याच्या घटना होतात. सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये उतरून सफाईचे काम करावे लागते. यावर उपाय म्हणून आता महानगरपालिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले दोन यंत्रमानव(रोबोट) आले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून दोन रोबोट महापालिकेच्या एम पश्चिम चेंबूर विभागाला गुरुवारी हस्तांतरित केले.
मॅनहोलमध्ये उतरणारे हे रोबोट जमिनीखाली शंभर फुटापर्यंत खोल जाऊन मल निस्सारण वाहिन्या साफ करू शकतात. त्याचबरोबर नालेसफाई सुद्धा योग्य तऱ्हेने करू शकतात. मॅनहोल लाईनमध्ये उतरून सफाई करताना मिथेन आणि इतर घातक रासायनिक पदार्थांच्या वासामुळे कामगारांना जीव गमवावा लागत होता. या रोबोटमुळे मात्र, कामगारांना पाईप लाईनमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा - ...अन् तिने रेल्वे स्थानकावरच दिला बाळाला जन्म
चेंबूरच्या एम पश्चिम विभागामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी या दोन मशीन एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांना हस्तांतरित केले. यामुळे मुंबईतील नालेसफाई अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. या दोन अत्याधुनिक रोबोटची किंमत 88 लाख रूपये आहे. रोबोटचा वापर करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दर दोन महिन्याला कामगारांना आणि अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेऊन याचा अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती बीपीसीएलचे अधिकारी सी .जी. अय्यर आणि पालिका सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.