मुंबई - भांडुप-पश्चिम येथील अशोक केदारे चौकात किरकोळ कारणावरून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अशोक केदारे चौकातील बंड्या रेडियम या दुकानासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी भीमा गुप्ता आणि अन्य एकास ताब्यात घेतले आहे.
भीमा गुप्ता आणि विजय यादव यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली होती. ही बाचाबाची नंतर विकोपाला गेली. या दरम्यान भीमा गुप्ता याने विजयच्या दिशेने गावठी कट्ट्यातून २ गोळ्या झाडल्या. मात्र, यात विजयला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. गोळीबाराची घटना पाहून स्थानिकांनी भीमा गुप्ताला पकडले व त्याच्याकडील पिस्तूलकडून घेतली. त्यानंतर स्थानिकांनी लेगेच या घटनेची माहिती भांडुप पोलिसांना दिली. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी भीमा गुप्ता आणि अन्य एकास ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलिसांनी भीमा गुप्ता याच्या जवळील पिस्तूल जप्त केली.
काही दिवसांपूर्वीच या भागातील दोन गटांमध्ये ऐरोली येथील गरम मसाला हॉटेल परिसरात गोळीबार झाला. ही गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे भांडुपमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.