मुंबई - विधानसभेची रणधुमाळी आता संपली आहे. राज्यात पुन्हा भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जरी युतीच्या जागा जास्त आल्या असल्या तरी आघाडीने राज्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी अनेक नवे चेहऱ्यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. त्यातच एक वेगळी गोष्ट म्हणजे यावेळी दोन सख्या भावांच्या जोड्या विधानसभेत गेल्या आहेत. माढ्याचे शिंदे बंधू आणि लातूरचे देशमुख बंधू एकाच वेळी विधानसभेत दिसणार आहेत.
राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन भावांच्या जोड्या एकसाथ विधानसभेत दिसणार आहेत. माढ्याचे शिंदे बंधू आणि लातूरचे देशमुख बंधूनी इतिहास घडवला आहे. या दोन भावांच्या जोड्या एकाच वेळी विधानसभेत गेल्याने माढ्यासह लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हेही वाचा - अहं हॅट्रिकचं... शरद पवारांचा पठ्या विजयी झालायं..!
हेही वाचा - अजित पवारांसह विश्वजीत कदमांचे मताधिक्य पाहून व्हाल थक्क...राज्यातील ५ विक्रमी विजयवीर
देशमुख बंधू
दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र एकाच वेळी विधानसभेत दिसणार आहेत. लातूकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. अमित देशमुख हे तिसऱ्यांदा लातूर शहरमधून आमदार झाले आहेत. तर त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख हे प्रथमच विधानसभेला निवडून आले आहेत. त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सचिन देशमुखांचा तब्बल १ लाख २१ हजार मतांनी पराभव केला.
शिंदे बंधू
माढा विधानसभा मतदारसंघातून बबनराव शिंदे हे सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. तर त्यांचे बंधू संजयमामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हे दोन्ही भाऊ आता एकाच वेळेस विधानसभेत दिसणार आहेत. बबनदादा शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा तब्बल ६८ हजार मतांनी पराभव केला. तर करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे हे प्रथमच आमदार झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विद्यमान आमदार असणारे नारायण पाटील यांचा ४ हजार ४०० मतांनी पराभव केला.