मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही युवक घराबाहेर पडत दुचाकीवर बसून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता टिकटॉकवर व्हिडिओ बनवून प्रसारित करत आहेत. अशाच एका बाबीप्रकरणी देवनार पोलिसांनी सरफराज शाहिद अली शेख (वय 20) आणि मोहम्मद फैजल शेख (वय 22) या दोघांना अटक केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद आहे. तसेच अति महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर तुरळक वाहन दिसताहेत.
मात्र, या परिस्थितीचा फायदा काही समाजकंटक घेताना पाहायला मिळत आहेत. हे समाजकंटक घरात न बसता संचारबंदीचे उल्लंघन करत मोटरसायलवर फिरत आहेत. कोणी वेगाने वाहन चालवत आहेत, कोणी स्टंटबाजी करत थेट पोलिसांना आवाहन करताहेत. तर, कोणी घरात बसलेल्यांना बाहेर घराबाहेत पडण्यास प्रोत्साहन मिळेल, असे टिकटॉक व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करत आहेत.
सोमवारी शिवाजीनगर गोवंडी येथे राहणारे सरफराज शाहिद अली शेख आणि मोहम्मद फैजल शेख हे दोघे चेंबूर संताक्रूज लिंक रोडवर 110 ताशीच्या वेगाने मोटरसायकल पळवत होते. त्यांनी याचा व्हिडिओ काढून सामाज माध्यमावर टाकला. हा व्हिडिओ जागरूक व्यक्तीने मुंबई पोलिसांना ट्विटरवर टॅग केला आणि पोलीस कामाला लागले. देवनार पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. तर, पोलिसी खाक्या दाखवताच चूक झाल्याची त्या दोघांनी कबुली दिली आहे.