मुंबई - ब्रँडेड विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई धारावी पोलिसांनी केली. हौसी परमार या 32 वर्षीय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
14 मेला धारावी परिसरातील संत कक्कया मार्गावरील भारतीय चाळ येथील रूम नंबर 3312मध्ये ब्रांडेड कंपनीच्या विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा मारला. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ब्रांडेड स्कॉच व्हिस्कीच्या एक लिटर क्षमतेच्या 60 भरलेल्या दारूच्या बाटल्या व 45 रिकाम्या बाटल्या, असा 2 लाख 42 हजार 815 रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ड) (ई) नुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - वाघिणीच्या 'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार
आणखी एक ठिकाणी छापा -
याबरोबरच धारावी पोलिसांकडून आणखी एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये इम्रान फारुक शेख उर्फ बॉक्सर हा आरोपी संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी या आरोपीची तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून 44 ग्राम एमडी अमली पदार्थ आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 2 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. याबरोबरच या आरोपीकडून 2 मोबाईल फोनसुद्धा हस्तगत करण्यात आले.
हेही वाचा - कोरोना काळात मदतीचे योगदान; कोल्हापुरात मुस्लीम बांधवांची 'ईद' साध्या पद्धतीने साजरी