मुंबई: नरेडी ज्वेलर्समध्ये काम करणारे हरिराम घोटिया (31 वर्षे) आणि त्यांचा भाचा प्रशांत चौधरी हे 31 मे ला सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान हैदराबादहून मुंबईतील बीकेसी येथे 2 कोटी 62 लाख 10 हजार रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने तसेच 2000 च्या नोटा देण्यासाठी निघाले होते. दरम्यान, सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोघांना दिल्ली क्राईम ब्रँच पोलीस असल्याची बतावणी करून राजस्थानच्या आरोपींनी त्यांच्याकडील मालमत्ता लुटली होती. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पावणेतीन कोटींचा मुद्देमाल पळून नेणाऱ्या आंतरराज्यीय आरोपींना 48 तासात अटक करण्यात आली आहे.
ऐवज लुटून काढला पळ: मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले तक्रारदार हरिराम धनाराम घोटिया (३१) हे हैदराबादमधील रेडी ज्वेलर्समध्ये काम करतात. ते सध्या हैद्राबादमध्ये वास्तव्यास असून गेल्या आठवड्यात खासगी बसने मुंबईत आले. ते आणि त्यांचा भाचा प्रशांत चौधरी बसमधून उतरताच त्यांना एका चौकडीने दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून ताब्यात घेतले. या लुटारूंनी त्यांच्याकडील एकूण २ कोटी ६२ लाख किमतीचा ऐवज काढून घेत पोबारा केला. त्यापैकी सायन पोलिसांनी 1 कोटी 70 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. घोटिया यांच्याकडे दोन हजारांच्या नोटांची २७ लाखांची रक्कम आणि १ कोटी १० लाखांची सोन्याची बिस्किटे तसेच, सव्वा कोटींची हिरेजडीत दागिने होते.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल: पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले होते. सायन पोलिसांनी दोन आरोपींना शिताफीने पकडून मुंबईत आणले आहे. त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे. तक्रारदार हरिराम घोटिया यांनी चार अनोळखी इसमांविरुध्द तक्रार दिल्याने सायन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
हेही वाचा: