मुंबई - मुंबईवर मागील पंचवीस वर्षांपासून सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेची आपला पारंपरिक गड असलेल्या वांद्रे पश्चिम या मतदारसंघात पहिल्यांदा आपल्याच आमदाराच्या बंडखोरीने डोकेदुखी वाढली आहे. यामुळे मातोश्रींचे अंगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदार संघात सेनेची केविलवाणी अवस्था झाली असल्याचे आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिसून आले. या मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून कायम दबदबा असलेल्या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनीच मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला आव्हान दिले आहे.
यामुळे सेनेच्या पायाखालची वाळू सरकत आहे म्हणूनच सेनेने काल (शुक्रवार) तृप्ती सावंत यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर करून आपली डोकेदुखी कमी होईल यासाठीचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांमध्ये बाळा सावंत यांच्या पत्नी म्हणून तृप्ती सावंत यांच्याकडेच प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा ओढा असल्याने सेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत सेनेने आपले आंगण सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी ताकद लावली आहे.
मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांनी हा गड आपल्याकडे कायम ठेवला होता. परंतु मध्येच त्यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु येथील शिवसैनिकांनी तृप्ती सावंत यांना मोठ्या मताने विजयी करून बाळा सावंत यांच्याबद्दलची निष्ठा स्पष्ट केली होती. आता शिवसेनेने या मतदारसंघात बाहेरून उमेदवार लादला असल्याने त्याबद्दल येथील शिवसैनिकांमध्ये मोठे नाराजी पसरली असून त्याचा मोठा फटका सेनेला बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत
तर दुसरीकडे याच मतदारसंघात माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झीशान सिद्दिकी ही मैदानात असल्याने याचा मोठा फायदा काँग्रेसलाही होऊ शकतो, असे बोलले जाते. या मतदारसंघात एकूण 16 उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त प्रचार सेना, काँग्रेस, मनसे आणि वंचितकडून करण्यात आल्याचे दिसून आले.
वांद्रे पूर्व मतदारसंघात गुलनाज कुरेशी या नगरसेविकेचे पती मोहम्मद कुरेशी हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाकडून उभे आहेत. तर मनसेकडून अखिल चित्रे, पीपल पार्टी ऑफ इंडियाकडून प्रगती जाधव, बहुजन मुक्ती पक्षाकडून मोहम्मद उमेर, इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून नूर मोहम्मद शेख आणि वंचित बहुजन आघाडीकडून जावेद अहमद शेख, असे मैदानात आहेत. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ असून त्याखालोखाल मराठी आणि उत्तर भारतीय मतांचा सर्वाधिक भरणा आहे.
मागील अनेक निवडणुकांमध्ये हे माजी आमदार बाळा सावंत यांनी या मतदारसंघांमध्ये अत्यंत चांगला समन्वय साधत मुस्लीम मतदार हे आपलेसे केले होते. मात्र, आता काँग्रेससह इतर अनेक लहान पक्षांनी सुद्धा मुस्लिम उमेदवार दिले असल्याने तसेच वंचितचा ही एक मुस्लीम उमेदवार उभे असल्याने सेनेप्रमाणे मुस्लिमांची मते मोठ्या प्रमाणात विभागली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी