मुंबई - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. मात्र, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून 5 हजार तृतीयपंथीयांना सेवा दिली जात आहे. याचा अर्थ अजूनही तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी झालेली नाही. महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथी सदिच्छा दूत असतानाही ही परिस्थिती असल्याने मतदार नाव नोंदणीसाठी शासनाला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
मुंबईतील जोगेश्वरी-पूर्व, विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, शिवडी आणि कुलाबा या 6 विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथीयाची मतदार म्हणून नोंद झालेली नाही. मुख्य म्हणजे यंदा निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नेमणूक तृतीयपंथी श्रीगौरी सावंत यांची निवड केली आहे, असे असतानाही मतदार नोंदणीत वाढ झालेली दिसत नाही.
मुंबईत बहुतेक तृतीयपंथीय हे दक्षिणेकडील राज्यांतून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. त्यांचे मूळ रहिवाशी पुरावे 'त्या' राज्यातील आहेत. त्यामुळे बहुदा परिणामी, मतदार नोंदणीत त्यांचा आकडा कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. हेही कारण मतदार नोंदणीत निरूत्साह असू शकते, असे सांगण्यात येत आहे.