मुंबई - मुंबईत पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात. मोलमजुरी करून दिवस ढकलणाऱ्या या मजुरांवर आणि माथाडी कामगारांवर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी गिरगाव, काळबादेवी येथील व्यापारी अशा लोकांच्या मदतीला धावून आली आहेत. व्यापारी संघटनांकडून या लोकांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला असून यात दोन वेळेचं जेवण त्यांना दिलं जात आहे.
काळबादेवी हनुमान गल्ली येथे मोठ्या संख्येने माथाडी कामगार, मजूर आहेत. सध्या रोजगार नसलेल्या 400 कामगारांना दोन वेळेचं जेवण हे व्यापारी देत आहेत. तर, लॉकडाऊन असेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हे अन्नदान सुरू राहणार आहे. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळत आहे.
कोरोनापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा या सर्व नियमांचं पालन करत हे व्यापारी गरिबांचं पोट भरत असल्याने त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.