मुंबई Tourist Rush In Mumbai: डिसेंबर महिना म्हटलं की, वर्षाचा अखेर आणि नाताळचा महिना असं या महिन्याकडे पाहिलं जातं. दुसरीकडे मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन देखील खवय्ये करत असतात. दरम्यान, सध्या शाळा-कॉलेजला नाताळ सणानिमित्त सुट्या आहेत. (Gateway of India) या सुट्यामुळं मुंबईतील पर्यटन स्थळांवर मुंबईकरांची तसेच पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतेय. मुंबईतील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय तसेच गेट वे ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणी सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे.
राणीची बाग पर्यटकांनी फुलली: राणीच्या बागेचं अप्रूप लहानग्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांना आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या व्यक्तीनं जर राणीच्या बागेला भेट दिली नाही तर मुंबई बघितली याला मान्यता मिळत नाही, असं गंमतीने म्हटलं जातं. राणीच्या बागेचं नूतनीकरणानंतर येथे विविध जातीचे पक्षी आणि प्राणी आणले आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी विदेशातून पेंग्विन आणले आहेत. हे पाहण्यासाठी देखील लोकांची गर्दी होते. परंतु सध्या राणेच्या बागेत नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. आमच्या मुलांना नाताळच्या सणानिमित्त सुट्टी पडल्यामुळं आम्ही पनवेलवरून येथे खास राणीची बाग आणि या बागेतील पशु-प्राणी पाहण्यासाठी आलो आहोत, असं पर्यटकांनी सांगितलं.
गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी गर्दी: दुसरीकडे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाची ओळख आहे. गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. दरम्यान, आता वर्षाअखेर आणि नाताळच्या सुट्टीनिमित्त मुंबईतील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबर या दिवशी गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. पण सध्या नाताळच्या सुट्यांमुळं राणाची बाग पाहण्यासाठी जशी गर्दी दिसत आहे, तशीच गर्दी गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी देखील पर्यटकांची दिसून येत आहे.
हेही वाचा: