मुंबई - आयुष्यभर बचत करून त्याद्वारे विदेशी पर्यटनाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न कोरोना प्रादुर्भावामुळे भंगले आहे. विदेशवारीसाठी पैसे भरूनही यावर्षीचे पर्यटन रद्द झाले आहे. याचा फायदा मात्र पर्यटन कंपन्यांनी उठविला आहे. रद्द झालेल्या विदेशवारीचे पैसे न देता 2021 रोजी सहलीला जा, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने याबाबत सर्व्हे करण्यात आला होता. यात ही बाब समोर आली आहे.
पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेत 5 हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी सहभाग नोंदवला होता. कंपन्या करत असलेल्या मनमानीबाबत ग्राहकांच्या मनात तीव्र संतापाची भावना भावना आहे. ग्राहकांनी भरलेल्या रकमेतून प्रत्येकी 20/25 हजार रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम कापून स्वत:कडे ठेवण्याचेसुद्धा या कंपन्यांनी ठरवले आहे. या विरोधात मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने 15 ते 24 जून या कालावधीत ऑनलाईन सर्व्ह घेण्यात आला. 5 हजारहून अधिक पर्यटक त्यात सामील झाले. त्यात 40 टक्क्याहून अधिक ज्येष्ठ नागरिक होते. पर्यटन कंपन्यानी देऊ केलेले क्रेडिट शेल 88 टक्के ग्राहकांना अमान्य असून त्यांना दिलेल्या रकमेचा परतावाच हवा आहे. गरज भासल्यास यासाठी न्यायालयात जाण्याची देखील त्यांची तयारी आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले.
कोरोना काळात सर्व पर्यटन कंपन्या देशांतर्गत आणि परदेशी जाणाऱ्या सर्व सहल रद्द झाल्या आहेत. वर्ष अखेरीपर्यंत सहली सुरू होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारनेही फक्त अत्यावश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या डिसेंबर, जानेवारीपासून मार्च व त्यापुढचे आरक्षण करून ठेवलेल्या पर्यटकांनी रद्द झालेल्या पर्यटनाचे पैसे परत मागण्या सुरुवात केली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पर्यटन कंपनीने पर्यटकाचे घेतलेले पैसे परत न करत ते क्रेडिट शेलमध्ये ठेवण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने या सर्वेक्षणाच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याप्रकरणी स्वतः लक्ष घालून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. शासकीय स्तरावर या ग्राहकांना दिलासा न मिळाल्यास ग्राहकांना लढाई या शिवाय पर्याय नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.