मुंबई - मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात द्राक्ष निर्यातीच्या हंगामाने जोर धरला आहे. देशातून २१ मार्चपर्यंत ६,७९५ कंटेनरमधून ९१,५२३ टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातून ही निर्यात झाली. यात अर्थात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे.
राज्यातून ८३,५२१ टन निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. मागील वर्षी २१ मार्चला ५,४९३ कंटेनर मधून ७२,०६७ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा त्यात तब्बल २१ हजार टनांनी वाढ झाली आहे. राज्यातील नाशिक, सांगली, सातारा, नगर, पुणे, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांतून निर्यात झाली.
देशांतर्गत बाजारात द्राक्षांचे दर उतरलेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. द्राक्ष दरातील मंदी निर्यातदारांच्या पथ्थ्यावर पडली आहे. निर्यातक्षम द्राक्षेही कमी दरात मिळत असल्याने द्राक्ष निर्यातीचा वेग वाढला आहे.
युरोपात आवक वाढली
युरोपीय बाजारपेठेत यंदा प्रथमच पेरु देशातील द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दक्षिण अफ्रिका, चिली यासोबत यंदा प्रथमच पेरुशी स्पर्धा होत आहे. या स्थितीत युरोपीय बाजारपेठेच्या क्षमतेपेक्षा जास्त आवक युरोप बाजारात झाली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. मागील वर्षीपेक्षा यंदा २१ हजार टन द्राक्षमाल जास्त गेला आहे. याचा पुढील दरावर परिणाम होऊ शकतो असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यातून झालेली द्राक्ष निर्यात (टनात)
जिल्हा - द्राक्ष निर्यात
नाशिक - ८३,५२१
सांगली - ४,२५१
सातारा - २,१५९
नगर - ६६७
पुणे - ५०५
लातूर - १४४
उस्मानाबाद - ९२
सोलापूर - ४९