मुंबई - कोरोनाचा कहर वाढत असताना अनभिज्ञ अशा विषाणूमुळे अहमदनगर जिल्ह्यातील टोमॅटो पीक संकटात सापडले होते. १२ हजार हेक्टरवरील टोमॅटो शेती आणि कोट्यावधीच्या टोमॅटो अर्थव्यवस्थेवर या विषाणूचे सावट होते. याबाबत ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित केली होती. कृषी विभागाने ईटीव्ही भारतच्या वृत्ताची दखल घेऊन काल ग्रीन कॉरिडोर तयार केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोला या प्रमुख टोमॅटो उत्पादन तालुक्यांमधून संक्रमित टोमॅटो वनस्पतींचे नमुने तपासणीसाठी आज बंगळुरूला पाठवण्यात आले आहे.
काल कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून टोमॅटोचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर हे नमुने बंगळुरूला पाठवण्यात आले. नमुन्यांमध्ये अज्ञात विषाणू संक्रमित टोमॅटोचे फळ आणि बियाण्यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने आज पहाटे बंगळुरू स्थित भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (आयआयएचआर) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून तातडीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला विषाणू नियंत्रणासाठी सल्ला देण्याची मागणी केली आहे.
टोमॅटो वनस्पतींचे नमुने बंगळुरूला पाठवण्याचे मी स्वागत करतो. परंतु, पारदर्शक आणि सखोल चाचणी होऊन तातडीने अहवाल जाहीर झाला पाहिजे. या अहवालाचे निष्कर्ष बियाणे कंपनीशी संबंधित असतील तर तातडीने कार्यवाही व्हायला पाहिजे. आगामी लागवडीसाठी हेच बियाणे वापरले जात असेल तर तातडीने यासंदर्भात हस्तक्षेप होण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान वाचेल, अशी मागणी डॉ. नवले यांनी केली आहे.
कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले, सरकार लाखो करोडो रुपये खर्च करून विद्यापीठ चालवत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा काय, हाच प्रश्न आता मनात येत आहे. महाराष्ट्र इतके मोठे राज्य असून याच राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत. त्या चारही कृषी विद्यापीठात विषाणूजन्य रोगांचे नमुने तपासणीची सोय नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विशेष प्रकल्प अंतर्गत विषाणू तपासणीची सर्व व्यवस्था महात्मा फुले कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे. परंतु, आवश्यक मनुष्यबळ नसल्याने विषाणूजन्य पिकांची तपासणी होऊ शकत नाही. या प्रकरणातून धडा घेऊन आता तरी विद्यापीठांनी या प्रकारची सोय विद्यापीठ पातळीवर करावी, म्हणजे भविष्यात असे संकट आल्यास शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जावे लागणार नाही. सरकारने किंवा कृषी मंत्रालयाने यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून विद्यापीठांच्या कारभारावर वेळीच नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे बनले आहे, असे डॉ. चोरमुले म्हणाले.
भारतात भाजी पिकांमध्ये भेंडी व कांदा पिकांखालोखाल टोमॅटो पिकाखालील क्षेत्र सर्वात अधिक म्हणजे जवळपास ३.५ लाख हेक्टर एवढे आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र जवळपास १२ हजार हेक्टर एवढे आहे. उत्पादनाच्या बाबतीत उत्तरप्रदेश व कर्नाटक खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. सध्या टोमॅटो लागवडीकरिता सरळ वाणांबरोबरच संकरित वाणांचा मोठया प्रमाणावर वापर होतांना दिसून येते. संकरित वाणांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव त्यामानाने अधिक आढळून येतो.
महाराष्ट्रात हे पीक मे-जून, ऑगस्ट व ऑक्टोबर अशा वर्षातील तीन हंगामात घेतले जाते. टोमॅटोचे जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मोठी अपेक्षा आहे. सध्यातरी त्यांनी उभारलेल्या व्यवस्थेमध्ये मनुष्यबळाअभावी हेळसांड होत आहे. राज्य सरकार याबाबत कठोर उपाययोजना करून शेतकऱ्याला न्याय देईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.
हेही वाचा- काँग्रेसच्या दोन माजी पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह ट्विट.. संबित पात्रांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल