मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना मुंबई उपनगरातील काही भागात मृतांच्या आकड्यातही भर पडत आहे... तर नालासोपारामध्ये रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि माणुसकीचा अंत झाला असल्याचे दर्शवणारी घटना घडली आहे.. एका व्यक्तीचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला आहे.. महाविकास आघाडीत बिघाडी करण्यासाठी काही जण वाट पाहत असल्याची टीका थोरांतांनी केली आहे.. यासह राज्य आणि देशातील सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..
मुंबई - मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. महानगरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही रोजच वाढत आहे. येथील धारावी, माहिम, दादर, अंधेरी पूर्व व कुर्ला या विभागात सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तर फोर्ट, कुलाबा, सॅन्डहर्स्ट रोड येथे सर्वात कमी मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
वाचा सविस्तर - मुंबईत धारावी, अंधेरीसह कुर्ला येथे सर्वाधिक कोरोनाच्या मृत्यूंची नोंद
नालासोपारा (पालघर) - नालासोपाऱ्यात रुग्णालयाबाहेर एका बेवारस व्यक्तीचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत पाच दिवस रुग्णालयाबाहेर पडून होता. तसेच या रुग्णाबाबत येथील दुकानदारांनी रुग्णालयाला माहिती दिली होती. मात्र रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी या घटनेवरून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वाचा सविस्तर - माणुसकीचा अंत..! रुग्णालयाबाहेरच 'त्याचा' तडफडून मृत्यू
हैदराबाद - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने रविवारी उच्चांक गाठला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये देशात तब्बल 24 हजार 850 नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांच्या बेरजेसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 73 हजार 165 इतका झाला आहे. मागील 24 तासात 613 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 19 हजार 268 वर पोहोचली आहे.
वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
अहमदनगर - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. आघाडी भक्कम आहे, एकत्र आहे आणि एकत्र काम करत आहे. काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत, असा टोला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे. संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या अभियनाअंतर्गत बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली.
वाचा सविस्तर -'महाविकास आघाडीत बिघाडी नाही, पण काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत'
वर्धा - यंदाच्या जून व जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणचे तलाव, नदी, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच सर्व परिसर हिरवागार झालेला आहे. यामुळे अनेकांची पावले निसर्गरम्य ठिकाणी वळू लागली आहेत. त्यात सोशल मीडियावर सेल्फी शेअर करण्याची, तरुणाईची जणू क्रेझच बनली आहे. परंतु तलाव परिसरात अतिउत्साहात सेल्फी काढण्याचा मोह मित्रांना जीवावर बेतला आहे.
वाचा सविस्तर- सेल्फीचा मोह जीवावर बेतला; दोघांना जलसमाधी, तिघे बचावले
सोलापूर - यंदाच्या वर्षी नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवात दमदार झाली आहे. हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आनंदी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला खरिपांच्या पिकांची पेरणी केली. मात्र, जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या दरम्यान, एका वयोवृद्ध जोडप्याचा, दुबार पेरणी करतानाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वाचा सविस्तर - पावसाची दडी; ऐंशी वर्षांचा बळीराजावर दुबार पेरणीचं संकट, पत्नीसह पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई - राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. 1 ते 4 जुलैपर्यंत राज्यातील 9 लाख 15 हजार 201 शिधापत्रिका धारकांना 67 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
वाचा सविस्तर - राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 67 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप - मंत्री छगन भुजबळ
पुणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच मुसंडी मारली आहे. हीच स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून आज (दि. 5 जुलै) आणि उद्या (दि. 6 जुलै) मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय येत्या चार दिवसात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वाचा सविस्तर -येत्या ७२ तासांत कोकण, मराठवाडा, विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई - पुढील 24 तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल. 7 ते 9 जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
वाचा सविस्तर -महत्त्वाची बातमी : जाणून घ्या, 9 तारखेपर्यंत कोठे कोसळणार मुसळधार?
श्रीनगर : काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक दहशतवादी काश्मीरचा तरुण होता. चकमकीपूर्वी त्याचे वडील त्याला शरण येण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यास त्याने नकार दिला, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. हिलाल अहमद असे या तरुणाचे नाव होते. तो काही दिवसांपूर्वीच हिजबुलमध्ये सहभागी झाला होता.
वाचा सविस्तर - VIDEO : "शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं...