मुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनामुळे आजच्या राष्ट्रीय शेतकरी दिनाला राजकीय दृष्ट्या वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज ३० दिवस पूर्ण होत असताना केंद्र सरकारकडून कोणतेही शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणताही सकारात्मक निर्णय होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आजचा शेतकरी दिन म्हणजे शेतकऱ्यांच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा आज 30 वा दिवस आहे. केंद्राकडून करण्यात येणाऱ्या आवाहानाला शेतकरी संघटनांनी प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि विरोधकांवर जहरी टीका केली आहे.
सरकारला थंडीत मरणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता नाही-
या देशातील शेतकरी कृषी कायद्याविरुद्ध गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करत आहे. मुंबई महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. पंजाब हरिणाचा शेतकरी तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर थंडी वाऱ्यात आंदोलन करत आहेत. मात्र, याची कोणाला चिंता नाही. त्यांची कुटुंबांची चिंता नाही, आतापर्यंत १२ शेतकरी आदोलनामध्ये थंडी वाऱ्यात तडफडून मेले आहेत. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी-
जय जवान जय किसान यातील जवान रोजच शहीद होत आहेत आणि किसान सुद्धा आज हक्कासाठी आत्महत्या करत आहे. देशाचा कणा शेतकरी असला तरी काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा कणा मोडून टाकण्याचे पाप हे सरकार करत आहे. सरकारला विनंती आहे की, सरकारला हात जोडून विनंती आहे, तुमचा अंहकार बाजूला सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करा ते आपले अन्नदाते आहेत, असे आवाहनही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केले.