मुंबई - राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. रविवारी 4092 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात काही प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आज(15 फेब्रुवारी) 3365 नवे रुग्ण आढळून आले असून, 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी 3365 नवीन रुग्ण -
सोमवारी राज्यात 3365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 67 हजार 643 वर पोहचला आहे. तर आज 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 552 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.7 टक्के तर मृत्यूदर 2.49 टक्के आहे. राज्यात आज 3105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 78 हजार 708 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 53 लाख 59 हजार 026 नमुन्यांपैकी 20 लाख 67 हजार 643 नमुने म्हणजेच 13.46 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
14 फेब्रुवारीला रुग्ण संख्या वाढली -
दोन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. काल तब्बल दोन महिन्याने पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली होती, काल 4092 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात