मुंबई - राज्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मुंबईतल्या ६ लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी आज सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभा मुंबईत होणार आहेत.
सर्वच राजकीय पक्ष हे विजयासाठी तर मनसे विरोधकांना पाडण्यासाठी आज शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा होणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या ईशान्य मुंबईच्या उमेदवार निहारिका खोदले यांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांची विक्रोळी येथील धर्मवीर संभाजी मैदानात संध्याकाळी 5 वाजता सभा होणार आहे. दुसरीकडे ईशान्य मुंबईचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार शिवाजी नगर, गोवंडी येथे सायंकाळी 6 वाजता सभा घेणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी जोगेश्वरी येथे अशोक चव्हाण रोड शो करणार आहेत.
विरोधक सभा घेत असतील तर सत्ताधारी कसे पाठीमागे राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे देखील गजानन कीर्तिकर यांच्यासाठी जोगेश्वरीत तर गोपाळ शेट्टी यांच्यासाठी दहिसर येथे सभा घेणार आहेत. पण या मातब्बर नेत्यांमध्ये लाव रे तो व्हिडीओ या वाक्याची चर्चा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर पहिली सभा मुंबईत काळाचौकी येथे असणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या सभेवर लागले आहे.