मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्याकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक देशद्रोही असल्याचे गंभीर आरोप केले होते. राज्यपालांच्या अभिभाषनानंतर दोन्ही सभागृहात कामकाजाला सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. सत्ताधारी आणि विरोधक यावेळी आमने सामने आले. विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी बोलू न दिल्याने विरोधक संतापले. वेलमध्ये उतरून त्यांनी सत्ताधारी आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळात दिवसभराचे कामकाज रेटून नेत अवघ्या तासाभरात आटोपले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत दुसऱ्या दिवशी विरोधकांना बाजू मांडण्यास संधी देणार असल्याचे सांगितले. आज दुसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा आक्रमक पवित्रा घेतील, अशी शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा गाजणार : दोन्ही सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात आज प्रश्नोउत्तराच्या तासाने होणार आहे. विधानभवनात एसटी कर्मचाऱ्यांना दहा वर्षांपासून रखडलेले निवृत्तीवेतनाचा मुद्दा मेघना बोर्डीकर उपस्थित करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांची अवहेलना नाही केली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात भाजपने सहा महिने आंदोलन छेडले होते. या मुद्द्यावरून विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
पत्रकारांचा संरक्षण कायदा : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारसे यांचा अपघात झाला. रिफायनरी प्रकल्पात भु माफिया फोफावले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात वावरत असल्याची बातमी त्यांनी प्रसिद्ध केली होती. दुपारी राजापूर येथील पेट्रोल पंपावर गेले असता, भु माफिया पंढरीनाथ आंबेरकर यांनी मनात राग धरून त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील लक्षवेधी मांडण्यात आली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा : राज्यपाल रमेश बैस यांनी पहिल्या दिवशी अभिभाषणातून राज्यातील वस्तुस्थिती मांडली. केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या योजनांची सभागृहाला माहिती दिली. विरोधकांनी यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचा आणि केंद्र सरकार करत असलेल्या धोरणांचा अभिभाषणात सर्वाधिक उल्लेख असल्याची टीका केली आहे. आज विरोधी पक्ष नेते राज्यपालांच्या भाषणावर मत मांडणार आहेत.